धुळे---जालना येथील मराठा उपोषणाचे तीव्र पडसाद धुळे जिल्ह्यात उमटले आहेत. गेले तीन दिवस येथे सातत्याने विविध संघटना, राजकीय पक्ष आंदोलन करीत आहेत. मराठा समाजाने काल या विषयावर अल्टिमेटम देत राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.
राज्य सरकारने (Maharashtra) आता आंदोलकांचा अंत पाहू नये, मराठा (Maratha) समाजाला तातडीने आरक्षण कसे देता येईल हा पर्याय घेऊन काम करावे, असे आवाहन शिंदखेडा (Dhule) येथील मराठा समाजाने केले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाजातर्फे येथील तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला, तसेच शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सकल मराठा समाजाने काढलेल्या मोर्चाने शिंदखेडा शहर दणाणले. भर पावसात ओलेचिंब होत सकाळी भगवा चौकातून मोर्चा निघाला. मोर्चादरम्यान जालना येथील लाठीमाराच्या घटनेचा घोषणा देऊन तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
दरम्यान, जालना घटनेच्या निषेधार्थ शिंदखेडा शहरात कडकडीत बंदही पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यवहार सकाळपासून पूर्णपणे ठप्प होते.
शहर आणि परिसरात पहाटे चारपासूनच जोरदार पाऊस सुरू आणि अशाही स्थितीत ध्येयाने पेटलेले समाज बांधव नियोजित वेळी पावसाची तमा न बाळगता भगवा चौकात जमले. दहाला मोर्चास सुरुवात झाली. भर पावसात पावसाची पर्वा न करता समाज बांधव मोर्चात सहभागी होत होते. नायब तहसीलदार शारदा बागले यांना निवेदन देण्यात आले.
गुन्हे तत्काळ मागे घ्या!
जालना घटनेचा निषेध करून समाजाच्या आंदोलकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, मराठा समाजाला संपूर्णपणे १५ ते २० टक्के आरक्षण मिळावे ही मागणी करण्यात आली. तसे न झाल्यास सकल मराठा सामाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला.
या वेळी अरुण देसले, राजेंद्र मराठे, नाना मिस्तरी, भूषण पवार, रऊफ बागवान, जाविद बागवान, अमिन तेली, गणेश खलाणे, उल्हास देशमुख, अमोल मराठे, गणेश मराठे, अॅड. विनोद पाटील, सुयोग भदाणे यांसह समाज बांधव सहभागी झाले होते.
0 Comments