धुळे- येथील साक्री रोडवरील सिंचन भवनच्या भिंतीलगत महापालिकेची सशक्त(!) पाईपलाईन सवयीप्रमाणे लीक झाली असून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. भटके गुरे-ढोरे, वाहनधारक, पाणीपुरीवाले त्या पाण्याचा उपयोग काय करायचा तो त्यांच्या पद्धतीने करतीलच परंतु या वाया जाणाऱ्या पाण्याचा महापालिकेने जवळच्याच नैसर्गिक उताराने विद्यावर्धिनी लगतचा हगऱ्या नाला भरून घ्यावा व भविष्यातील पाणी टंचाईवर मात करावी अशी विनंती ज्येष्ठ पत्रकार साथी गो.पि. लांडगे यांनी महापालिकेच्या सक्षम कारभाऱ्यांना केली आहे.
गो.पि. लांडगे यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, विद्यावर्धिनी लगतच्या हगऱ्या नाल्यात जर हे पाणी वळवले गेले तर त्यांचे भविष्यात काय व कशासाठी फायदे होतील याची यादी सांगण्याची गरज नाही. नाही तरी विविध पक्षांच्या बड्या नेत्यांकडून अक्कपाड्याने हरण्यामाळ, नकाणे तलाव भरण्याची मागणी होत आहे. सालाबादाप्रमाणे ती पूर्ण होणारच आहे तर मग आम्हा छोट्याशा पामरांची साधी हगऱ्या नाल्यात पाणी अडवण्याच्या छोट्याशा मागणीची विकासासहित सेवा हे ब्रिद असणाऱ्या महापालिकेकडून अपेक्षा करणे गैर नाही. आज पहाटे मॉर्निंग वॉकला जाताना एक वृत्तपत्र चालले. त्यात मालिकेच्या वतीने सिटी बस सेवेचे प्रयत्न व आयुक्तांनी पालिकेच्या लेट लतिफांची घेतलेली हजेरी’’अशा शिर्षकाचे वृत्त वाचले जरा बरे वाटले. मग त्याच त्या जागेवर पुन्हा-पुन्हा पाईप लाईन दुरुस्त करूनही लीक होते (पुन्हा पुन्हा का लिक होते? याचा शोध लागत नसेल तरयेथे एखादं कोंबडं-बकरं मारा आणि दोन-चार लोकांना खाऊ घाला नाहीतरी या जागेवर ‘खाऊगल्ली’ आहेच आणि ‘श्रावण’ही संपतोच आहे. ) त्यातून या वाया जाणाऱ्या पाण्याची ‘हजेरी’ घेण्याची नेमकी जबाबदारी कुणाची? असाही प्रश्न उपस्थित होतो. आमच्या साक्री रोड परिसरातील सभागृह गाजविणारे शक्तीशाली पॉवरफुल सव्वाशेर नगरसेवक या ‘छटाकभर’ कामाची काय दखल घेतात याबाबत परिसरातील पालिकेच्या घरपट्टी-पाणीपट्टी सह सर्व पट्ट्या नियमित भरणाऱ्या नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
0 Comments