शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी : दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सहावी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे नुकतीच संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सी. एस. खर्डे होते. केंद्रप्रमुख श्री. सी. जी. बोरसे, मुख्याध्यापक श्री. जे. पी. पाटील, पर्यवेक्षक श्री. व्ही. आर. महाले, सुलभक श्री. अरविंद पाटील, श्री. कैलास शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गीतमंचच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले. सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित शिक्षक शिक्षिका यांचा पेन व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
बदलत्या काळानुसार व शिक्षण क्षेत्रात होणारे आमूलाग्र बदल व परिवर्तन यादृष्टीने शिक्षक वर्गानेही नाविन्याचा ध्यास घेऊन आपल्यातील कौशल्ये अधिक विकसित करावीत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मासिक शिक्षण परिषदेमध्ये केंद्राचे केंद्रप्रमुख सी. जी. बोरसे यांनी उद्बोधन केले. सुलभक अरविंद पाटील यांनी ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या इयत्ता ३री, ६वी व ९वी या वर्गांसाठी ʻ परख ʼ या राष्ट्रीय सर्वेक्षणाची माहिती दिली. तसेच या सर्वेक्षणासाठी प्रश्न कसे तयार करावेत व अध्ययन स्तराचे विश्लेषण कसे करावे याबाबत अनमोल मार्गदर्शन केले.
शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सी. एस. खर्डे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले, की उशीरा काम केल्याने धावपळ होऊन दमछाक होते म्हणून कोणतेही काम वेळेवर पूर्ण करा असे आवाहन शिक्षकांना केले. या शिक्षण परिषदेसाठी शिंदखेडा केंद्रातील सर्व जि. प. शाळा व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. बी. जगताप यांनी केले. प्रास्ताविक श्री. सी. एस. पाटील यांनी सादर केले. श्रीमती अश्विनी जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. ʻ वंदे मातरम् ʼ राष्ट्रगानाने शिक्षण परिषदेची सांगता झाली.
0 Comments