Header Ads Widget

*धुळे लोकसभा मतदार संघातील विविध राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील विविध विकास कामांना नामदार नितीन गडकरी साहेबांकडून हिरवा कंदील - खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या विशेष प्रयत्नातून रस्त्यांचा व मतदार संघाचा होणार कायापालट..!*


*केंद्रीय रस्ते निधीच्या माध्यमातून धुळे शहरात ज्योती सिनेमा ते वीर सावरकर पुतळयापावेतो होणार नव्याने पूल..!*

(धुळे दि. ०६-०८-२०२५) धुळे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावरील अनेक महत्वाच्या विकास कामांना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी साहेबांकडून मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीसाठी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी सातत्याने पाठपुरावा करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. धुळे, शिंदखेडा मतदार संघातील नवीन रस्ते, धुळे शहरात नवीन पूल, रस्ते दुरुस्ती, रुंदीकरण, नवीन बायपास रस्त्यांचे विविध प्रस्ताव केंद्र सरकारदरबारी मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. या प्रस्तावांना मान्यता मिळाल्यामुळे नागरिकांना सुरक्षित, जलद व सुगम प्रवासासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
या विकास कामांत काही महत्त्वाचे प्रकल्प पुढीलप्रमाणे आहेत. यात १) मालेगाव कुसुंबा दोंडाईचा शहादा राष्ट्रीय महामार्ग १६० एच वरील बायपास रस्त्यांचा समावेश २०२५-२६ च्या वार्षिक योजनेत समाविष्ट करण्यात आला. २) मालेगाव - कुसुंबा - दोंडाईचा शहादा NH १६०H च्या चिंचवार ते लामकानी विभागाच्या रुंदीकरण करणे कामाला चालना मिळाली. ३) राष्ट्रीय महामार्ग १६० एच विभागाच्या दोंडाईचा ते शहादा या ४-लेनिंगबाबत कामाला हिरवा कंदील मिळाला असून लवकरच कामाचा समावेश होईल. ४) तापी नदीवरील टाकरखेडा गावाजवळील किमी १११/३०० वर राष्ट्रीय महामार्ग १६० एच वर प्रमुख पूल नादुरुस्त असल्याने त्या नवीन पुलाच्या बांधकामाबाबत देखील मंजुरी मिळाली आहे. ५) राष्ट्रीय महामार्ग ७५३ बीबी विभागाच्या सोनगीर-दोंडाईचा-नंदुरबार रस्ता चार पदरीकरण करणे कामाला देखील गती मिळाली असून त्याचा देखील समावेश २०२५-२६ च्या योजनेत झाला असल्याची माहिती देण्यात आली.
यात प्रामुख्याने धुळे शहरातील पांझरा या नदीवर एक मोठा पूल आहे. जो ब्रिटिश काळातील असून हा पूल जुना असल्याने आणि त्यावरून जड वाहतूक करण्यास मनाई आहे. यामुळे सर्व वाहतूक वीर सावरकर यांच्या पुतळयाजवळील असलेल्या लहान पुलावरून केली जाते. परंतु पावसाळ्यात हा पूल देखील पाण्याखाली बुडून जातो. यामुळे शहराचा संपर्क तुटतो या मार्गाचे महत्व पटवून देत सदरच्या पुलाला केंद्रीय रस्ते निधीच्या माध्यमातून ज्योती सिनेमा ते वीर सावरकर पुतळयापावेतो नव्याने पुलाला मंजुरी मिळाली आहे. या राज्य महामार्गां समवेतच विविध राष्ट्रीय महामार्गांना देखील मंजुरी मिळाली आहे.
या कामांमुळे स्थानिक पातळीवर दळण-वळणास मोठी चालना मिळणार असून पर्यटन व व्यापारालाही हातभार लागेल असे खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या सहकार्याने धुळे लोकसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा निर्धार यावेळी त्यांना माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला. खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या नियोजनबद्ध विकास कामांचा धडाका पाहून धुळेकर जनतेमध्ये शिस्त-नियोजन आणि सातत्याने पाठपुरावा करून विकास कामे करणारे नेतृत्व धुळे लोकसभा मतदार संघाला प्राप्त झाले आहे अशी भावना निर्माण झाली आहे.



Post a Comment

0 Comments