Header Ads Widget

*प्राचार्य संजीव गिरासे यांना बहिणाबाई चौधरी पुरस्कार जाहीर : १८ ला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूंच्या हस्ते वितरण*

 
शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा पहिला साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार साक्री तालुक्यातील म्हसदी येथील आदिशक्ती धनदाई माता शिक्षण प्रसारक संस्थेचे, स्वर्गीय अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय कार्यरत असलेले व शिंदखेडा तालुक्यातील धमाणे येथील रहिवाशी प्राचार्य डॉ. संजीव भगवानसिंग गिरासे यांना जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्काराचे वितरण 18 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते समारंभ पूर्वक पुरस्कार प्रदान केला जाईल, अशी घोषणा कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी शुक्रवार रोजी दुपारी ४ वाजता केली आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे या पुरस्कारासाठी १५ प्रस्ताव प्राप्त झाले होते, ज्यामध्ये १२ व्यक्ती आणि ०३ संस्थांच्या समावेश होता. यातून निवड करण्यासाठी विद्यापीठाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती या समितीत साहित्यिक प्राचार्य डॉ. नरेंद्र पाठक आणि साहित्य अकादमी प्राप्त बालसाहित्यिक आबा महाजन यांचा समावेश होता. निवड समितीने एकमताने प्राचार्य डॉ. संजीव गिरासे यांच्या नावाची बहिणाबाई चौधरी पुरस्कारासाठी शिफारस केली. 51 हजार रुपये रोख सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 18 ऑगस्ट रोजी विद्यापीठात जळगाव येथे  विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. म्हसदी येथील आदिशक्ती धनदाई माता शिक्षण प्रसारक संस्थेचे स्वर्गीय अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयात प्रोफेसर डॉ. संजीव गिरासे हे सध्या प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांच्या पाच कादंबऱ्या आणि सात कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तीन ललित गद्य प्रकाशित झालेले आहेत. त्यात कादंबरी प्रकारात लगीन, पायखुटी, पऱ्हेड, वडांग व डोचर या कादंबऱ्यांचा समावेश होतो. क्षितिज, पळत बी चावत बी, डफडं, मिरला, भित्तूक, हारीक, भरपूट हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. ललित गद्य प्रकारात आगारी, आयपन आणि छापा-काटा यांचा समावेश होतो. डॉ. संजीव गिरासे यांचे साहित्य विविध प्रकारच्या अभ्यासक्रमात देखील समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यांची डफडं कथासंग्रहातील 'जकात' ही कथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमात होती. त्याचबरोबर विद्यापीठाच्या एम. ए. पार्ट टू साठी त्यांच्या मिरला या कथासंग्रहातील मिरला व पेट्रोल पंप या दोन कथांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. शिवाय विद्यापीठाच्या एम. ए. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात ग्रामीण साहित्य प्रकारामध्ये 'डफडं' हा संपूर्ण कथासंग्रह अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला आहे. त्याचबरोबर प्रताप महाविद्यालय अमळनेर या स्वायत्त महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या मराठी विषयासाठी 'पायखुटी' या कादंबरीचा समावेश आहे. पायखुटी या कादंबरीचा हिंदी अनुवाद प्राध्यापक डॉक्टर दिनानाथ पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता १०वीच्या मराठी विषयासाठी डफडं कथासंग्रहातील 'बाबूजी' या कथेचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रा. डॉ. संजीव गिरासे यांनी आत्तापर्यंत विविध साहित्य संमेलनांमध्ये वेगवेगळ्या परिसंवादांमधून सहभाग घेतलेला आहे. गेल्या वर्षी जळगाव येथे झालेल्या बाविसाव्या  सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे सूर्योदय मराठी संमेलनाचे अध्यक्ष स्थानही त्यांनी भूषवलेले आहे. ते अहिराणी साहित्य परिषदेचे संचालक आहेत. त्यांच्या साहित्यावर विविध विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी संशोधन करीत आहेत.
प्राध्यापक गिरासे यांनी 'दिल से' या विनोदी कथाकथनाचे 4000 च्या वर कार्यक्रम सबंध देशभर केलेले असून महाराष्ट्रातील एक नामवंत वक्ते अशी त्यांची ख्याती आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments