शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी:- आज ६ ऑगस्ट २०२५ रोजी शिंदखेडा तहसील कार्यालयात जाऊन गेटवरच ठिय्या मांडून शिवसैनिकांनी सरकार विरोधात निदर्शने केली त्यांनी निवासी तहसीलदार श्रीमती शारदा बागले मॅडम यांना युरिया टंचाईबाबत निवेदन सादर केले. शिंदखेडा तालुक्यात सध्या युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अनिल गवांदे यांच्या समोर कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. मात्र, कृषी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थितीची कोणतीही कल्पना नसल्याचे दिसून आल्याने शिवसैनिकांनी त्यांना धारेवर धरले आणि सत्य परिस्थिती सांगितल्यावर अधिकारी निरुत्तर झाले. त्यानंतर शानाभाऊ सोनवणे व तहसीलदार अनिल गवांदे यांच्यात ग्रामपंचायत सरपंच आरक्षण वरून चागलीच शाब्दीक चकमक झाली त्या वेळी वातावरण तणावपूर्ण आणि संतप्त झाले. प्रसंगी प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले होते निवेदनात शिवसेनेने साठेबाजांवर गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करावी, बफर स्टॉक शेतकऱ्यांना खुला करावा,प्रत्येक गावात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, POS मशीनच्या गैरवापराची चौकशी व्हावी, युरियासाठी ग्रामस्तरावर हेल्पलाइन आणि वितरण केंद्र सुरू करावीत, तसेच ज्वारी खरेदी पुन्हा सुरू करावी अशा प्रमुख मागण्या मांडल्या. जर ७२ तासांत या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. "शेतकऱ्यांचे हाल थांबवले गेले नाहीत, तर तहसील कार्यालय हा शांततेचा नव्हे तर आक्रोशाचा केंद्रबिंदू बनेल," असे स्पष्ट शब्दांत शिवसेनेने सांगितले. दरम्यान, “रंमिबाज सरकारचा धिक्कार असो”, “युरिया आमच्या हक्काचा आहे, कोणाच्या बापाचा नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शेतकऱ्यांना भर उन्हात रांगेत उभे राहूनही युरिया मिळत नसल्याने त्यांचा रोष वाढत आहे. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, तालुका प्रमुख गिरिश देसले, माजी जि.प. सदस्य छोटू पाटील, कृ. ऊ. बा. सदस्य सर्जेराव पाटील, कल्याण बागल, शहर प्रमुख संतोष देसले, ईश्वर पाटील, नंदकिशोर पाटील, सागर देसले, रावसाहेब ईशी, भाईदास पाटील, आधार बोरसे, संतोष माळी नामदेव भिल यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. परिस्थितीच्या गांभीर्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. शासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन शिंदखेडा तालुक्यात युरियाचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
0 Comments