नरडाणा -: येथील पश्चिम रेल्वेचे रेल्वे स्थानक हे अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असलेले बनवण्यात आले. परंतु रेल्वे स्टेशन कडे जाणारा पुलाखालचा रस्ता बंद करण्यात आल्याने रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड यातना सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशन कडे जाणारा बोगदा तयार करावा अशी मागणी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवासी व ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात मा. प्रधानमंत्री मा. रेल्वेमंत्री यासह विविध मंत्री व शासकीय अधिकाऱ्यांना लिखित स्वरूपात तक्रार अर्ज पाठवण्यात आलेला आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, सुरत भुसावळ या पश्चिम रेल्वेच्या स्थानकावरील नरडाणा या गावाचे रेल्वे स्थानक हे अत्याधुनिक अशा सर्व सेवा व सुविधांनी युक्त जरी झाले असले तरी या रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी आधीपासून सुरू असलेला रस्ता बंद झाला असून, त्या जागी बोगदा करून द्यावा अशी मागणी नरडाणा येथील विविध प्रवासी व रेल्वे स्टेशन येथील ग्रामस्थांनी माननीय प्रधानमंत्री व माननीय रेल्वेमंत्री यांच्याकडे पाठवलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, नरडाणा गावाचे, नरडाणा गाव व रेल्वे स्टेशन असे दोन प्रमुख भाग आहेत. रेल्वे स्टेशन भागात राहणाऱ्या ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, दैनंदिन कामासाठी नरडाणा गावात जावे लागते. व गावातील विविध नागरिकांना रेल्वेच्या प्रवासासाठी, व रेल्वे संबंधित कामासाठी, रेल्वे स्थानकावर यावे लागते. शिक्षणासाठी गावातील शाळांमध्ये जाणारी विद्यार्थी, दैनंदिन व्यवहारासाठी बँकांमध्ये जाणारे नागरिक, दवाखान्यात जाणारी रुग्ण व त्याचे नातेवाईक, गावात विविध जीवनावश्यक वस्तूंसाठी ये जा करणाऱ्या ग्रामस्थांना सुरक्षित असा एकही रस्ता नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनच्या उड्डाणपुलावरून यायचे झाल्यास भरधाव वेगाने वाहणाऱ्या वाहनांच्या मधून रस्ता काढून जाणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळणे आहे. आधीचा बोगदा हा पावसाळ्यातील पाणी वाहण्यासाठी केलेली व्यवस्था होती. पश्चिम रेल्वेचे विभागीय अधिकारी अशोक कन्सल यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली असता, गेट क्रमांक 120 या ठिकाणी अंडर ब्रिज बोगद्याला मंजुरी दिली होती. परंतु त्या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून अजून पर्यंत कोणतेही दखल घेण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत इंदोर मनमाड मार्गाचं काम हे प्रगतीपथावर असून पूल क्रमांक 275 मधून दोन्ही परिसरातील लोकांचे दळणवळण होत असताना त्या ठिकाणी असलेला रेल्वे रुळाखालून जाणारा छोटासा पूल प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला असून, नागरिकांना विद्यार्थी व शेतकऱ्यांना रेल्वेच्या रुळांना ओलांडून यावे जावे लागत आहे. रुळावरून येणे हे प्रवाशांच्या विद्यार्थ्यांच्या व शेतकऱ्यांच्या जीविकास अत्यंत धोकेदायक असून, भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास या परिसरातील नागरिक रेल्वे रोको आंदोलन सुद्धा करू शकतील यामुळे रेल्वे प्रशासनाने ग्रामस्थांच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. असे या निवेदनात म्हटले आहे. संबंधित निवेदन हे प्रधानमंत्री, रेल्वे मंत्र्यांसह, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विद्यमान खासदार, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, व महाशय पोलीस अधीक्षक साहेब यांना या निवेदनाच्या प्रति पाठवण्यात आल्या आहेत. या निवेदनावर नरडाणा सह परिसरातील विविध ग्रामस्थ, प्रवासी, रेल्वे स्टेशन वरील नागरीक, शेतकरी व विद्यार्थी यांच्या सह्या आहेत.
0 Comments