धुळे :- सेवा दलाच्या शाखेचा मातीचा सुगंधाची ओढ आजही मनात दरवळत आहे. चाळीस वर्षांपूर्वी बाल सैनिक म्हणून शाखेवर येत होतो त्या शाखेच्या मातीच्या संस्काराच्या सुगंधाने दलदिनास उपस्थित राहू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन डोंबिवली स्थित ज्येष्ठ सेवा दल सैनिक प्रदीप गुजराथी यांनी केले. राष्ट्र सेवा दलाच्या दल दिनानिमित्त धुळे महानगर राष्ट्र सेवा दलातर्फे दलदिनाचा कार्यक्रम मातृ सेवा संघाच्या शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ‘युक्रांद’चे राज्य कार्यकारिणी सदस्य साथी दिलीप पवार, उद्योजक यतीन पाटील, जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण, महानगर कार्याध्यक्ष महेश बोरसे, आदी उपस्थित होते . यावेळी बोलताना प्रदीप गुजराथी म्हणाले की, सेवा दलाच्या शाखेत बाल वयात जे संस्कार झालेत ते संस्कार आयुष्यात कामी आले. त्या संस्काराची शिदोरी मुळे नोकरी करीत असताना तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. यावेळी दिलीप पवार सर यांनी सांगितले की, आयुष्यात मला जे काही मिळाले ते फक्त सेवा दला मुळे आहे. सेवा दला प्रती कृतज्ञता व्यक्त करीत सेवा दल वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले . यावेळी उद्योजक यतीन पाटील व शरद कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात ‘देह मंदिर चित्त मंदिर’ प्रार्थनेने अनिल देवपूरकर यांनी केली. प्रास्ताविक रमेश पवार यांनी केले; तर समारोप शरद कांबळे यांनी 'सेवादल सेवादल ध्यास जया, हर्षाने उल्लेखिल भावी इतिहास तया’ गीताने केली. दलदिनास ज्येष्ठ साहित्यिक जगदीश देवपूरकर, नितीन माने, मनोज वाघ,रमेश पाकड, दीपकभाई परदेशी, नुरा शेख, महेंद्र शिरपूरकर, भास्कर बापू पाटील, भैय्या पाटील, विजय महाले,तुकाराम शेंडे, साखरलाल देसले, भिलू आबा केले, प्रेम संन्यासी ,अशपाक खाटीक, गो.पि. लांडगे आदी उपस्थित होते.
****
0 Comments