शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील ग्रामदैवत व पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई सती माता यांचा वार्षिक यात्रोत्सव रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या यात्रोत्सवासाठी यात्रा उत्सव समिती व ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
यात्रोत्सवाच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता बेटावद ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. मंगलचंद जैन तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. महेंद्र कैलास माळी यांच्या हस्ते सतीमाता मंदिरात महापूजा व आरती संपन्न होणार आहे. यानंतर दुपारी २ वाजता ग्रामीण भागातील जुनी व पारंपरिक अशी ‘तगतराव’ची मिरवणूक काढण्यात येणार असून, रात्री ९.३० वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात तसेच मुख्य रस्त्यालगत विविध प्रकारच्या खेळण्यांची दुकाने, हॉटेल्स, मिठाईची दुकाने, पाळणे, गृहउपयोगी वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आली असून यात्रेचे आकर्षण अधिक वाढले आहे. भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता प्रशासनानेही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मुख्य रस्त्यावर पथदिव्यांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. निलेश मोरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बेटावद येथील सतीमाता यात्रोत्सवात पंचक्रोशीतील तसेच दूरदूरवरून येणाऱ्या सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा उत्सव समिती, ग्रामस्थ व ग्रामपंचायत बेटावद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments