Header Ads Widget

*ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी रद्द करा**वृत्तपत्र संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*


माजलगाव / प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील जाचक व अन्यायकारक अटी तात्काळ रद्द करून, पात्र असलेल्या सर्व ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानपूर्वक योजनेत समाविष्ट करावे, अशी ठाम मागणी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया (महाराष्ट्र प्रदेश) चे राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी  यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य शासनाने ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू केलेली सन्मान योजना ही अत्यंत स्वागतार्ह व प्रेरणादायी योजना असून, ६० वर्षे पूर्ण झालेल्या व किमान २५ वर्षे पत्रकारितेची सेवा केलेल्या पत्रकारांना दरमहा सन्मानपूर्वक मानधन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक पात्र व अनुभवी ज्येष्ठ पत्रकार या योजनेपासून वंचित राहात असल्याची गंभीर बाब निदर्शनास येत असल्याचे कुलकर्णी यांनी निवेदनात नमूद केले आहे.

कुलकर्णी म्हणाले की, *राज्यात असे अनेक ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्यांनी आपले ४० ते ५० वर्षे पत्रकारितेसाठी समर्पित केली. समाजप्रबोधन, लोकशाही मूल्यांची जपणूक आणि सामान्य जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. मात्र आज वृद्धावस्थेत त्यांच्याकडे कोणतेही स्थिर उत्पन्नाचे साधन नाही. अशा परिस्थितीत जाचक अटी, तांत्रिक त्रुटी किंवा किरकोळ कारणांवरून त्यांचे अर्ज नामंजूर करणे हे अन्यायकारक आहे.

एकदा अर्ज नामंजूर झाल्यानंतर, संबंधित पत्रकाराने सर्व त्रुटी पूर्ण करून पुन्हा अर्ज सादर केला तरी त्यावर फेरविचार केला जात नसल्याची बाबही अत्यंत गंभीर असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. यामुळे अनेक ज्येष्ठ पत्रकार मानसिक व आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर, कुलकर्णी यांनी शासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत –
ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील अनावश्यक व जाचक अटी रद्द कराव्यात,
६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व किमान निकष पूर्ण करणाऱ्या सर्व ज्येष्ठ पत्रकारांना तात्काळ योजनेत समाविष्ट करावे,
पूर्वी नामंजूर झालेल्या अर्जांवर फेरविचार करण्याची संधी द्यावी,
तांत्रिक किंवा शुल्लक त्रुटींमुळे कोणत्याही ज्येष्ठ पत्रकाराचा अर्ज नामंजूर करू नये.

माननीय मुख्यमंत्री महोदय हे संवेदनशील व लोकाभिमुख नेतृत्व असल्याने ते या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देतील व सर्व ज्येष्ठ पत्रकारांना सन्मान योजनेचा लाभ मिळेल, असा निर्णय घेतील, असा विश्वासही कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.

ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान आहे. शासनाने या बाबीकडे मानवीय दृष्टिकोनातून पाहावे असेही कुलकर्णी यांनी यावेळी नमूद केले.

Post a Comment

0 Comments