नरडाणा (प्रतिनिधी) – शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन मौजे पाष्टे येथे दि. 14 मार्च 2026 रोजी सायंकाळी चार वाजता करण्यात आले.
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते मॅडम यांच्या आदेशाने, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच तहसीलदार शिंदखेडा नितीनकुमार देवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरास गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार विजय गोस्वामी, भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी, मा जिप सदस्य नथा आबा, पाष्टेचे सरपंच मोतीलाल नामदेव वाकडे, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष ब्रिजेश पाटील, एम. डी. सिसोदे महाविद्यालयाचे प्राचार्य गिरासे सर, उपप्राचार्य आर. ओ. पाटील, विकास विद्यालयाचे उपमुख्याध्यापक कोतकर सर, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, पत्रकार भालचंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे शाल व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची फोटोफ्रेम देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास विद्यालय नरडाणा येथील विद्यार्थ्यांनी लेझीमच्या गजरात मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थिनी पार्थवी भदाणे हिने सादर केलेल्या शिवगर्जनेने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
शिबिरात महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख विभाग, पुरवठा विभाग, भारतीय डाक विभाग, निवडणूक विभाग, महावितरण, शिक्षण विभाग, बालविकास प्रकल्प, आधार नोंदणी, बँकिंग सेवा तसेच एकखिडकी योजना अंतर्गत विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
या अंतर्गत विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमिलेअर दाखले देण्यात आले. तसेच 7/12 उतारे, फेरफार पत्रके, रेशनकार्ड, संजय गांधी व इंदिरा गांधी योजना लाभ मंजुरी आदेश वितरित करण्यात आले. पीएम किसान योजनेचे नोंदणी अर्ज, ई-केवायसी सुविधा देखील देण्यात आल्या.
शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. एका चिमुकलीला शालेय उपयोगासाठी दप्तर देण्यात आले. एम. डी. सिसोदे विद्यालयातील दुचाकी वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम मा. पालक मंत्री जयकुमार रावल यांच्या जन्मदिनानिमित्त राबविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यंत्रसामग्री वाटप, डाक विभागामार्फत सुकन्या समृद्धी योजनेचे लाभ, आरोग्य विभागामार्फत तपासणी, अंगणवाडीमार्फत बेबी किट वाटप तसेच पशुवैद्यकीय विभागाकडून जनावरांसाठी मका बियाणे देण्यात आले.
सर्व विभाग एकत्र आणून शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी स्वाती वाघ तसेच त्यांच्या टीममधील प्रफुल्ल मोरे, महेंद्र पाटील, योगेश ठाकरे, मोनाली पवार, रत्ना राजपूत, संपत आखाडे, अमृत शिंदे, जितेंद्र सोनवणे, सुरेश कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या शिबिरातून अनेक लाभार्थ्यांना जागेवरच सेवा व कागदपत्रे मिळाल्याने “शासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
0 Comments