*जनमत-*
*दोंडाईचा-*
समाजातील विविध क्षेत्रांत प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठा कमी होत चालली आहे का, असा प्रश्न आज सर्वसामान्य नागरीकांच्या मनात निर्माण होताना दिसत आहे. प्रशासन, राजकारण, आरोग्य व्यवस्था, वीज वितरण व्यवस्था तसेच स्थानीक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाबाबत नागरीकांमध्ये वाढती नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दोंडाईचा येथील बसस्थानकावर घडलेल्या दोन सलग चोरीच्या घटनांनी नागरीकांना विचार करायला भाग पाडले आहे.
घटनास्थळावरून प्रत्यक्ष अनुभवलेला व मिळालेल्या माहितीनुसार, दोंडाईचा बसस्थानकावर एका पत्रकाराने आपल्या नातेवाईकांना नास्ता-थंड शितपेय देत एस.टी. बसमध्ये बसवण्यासाठी सोबत असताना गर्दीत त्यांच्या खिशातील सुमारे आठ ते दहा हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चलाखीने लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधीत पत्रकाराने तातडीने पोलीस प्रशासन तसेच बसस्थानक निरीक्षकांकडे धाव घेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून आरोपी शोधून काढण्याची व न्याय मिळवून देण्याची मागणी केली. मात्र या घटनेला काही काळ उलटूनही आरोपीचा शोध लागलेला नसल्याने तसेच चोरी गेलेली रक्कम परत मिळालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.दरम्यान, या घटनेनंतर अवघ्या आठ मिनिटांच्या अंतराने त्याच बसस्थानकावर आणखी एक चोरीची घटना घडल्याची माहीती समोर आली आहे. चाळीसगावकडे जाण्यासाठी धुळे मार्गे जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये दोन महिला प्रवासी बसल्या असताना त्यांच्या पर्समधील सुमारे पाच तोळे सोन्याचे मंगळसूत्र (पोत) तसेच दहा हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे.
ही बाब संबंधीत महिलेला तात्काळ लक्षात आली नाही. मात्र बस पुढे मेथी गावाजवळ पोहोचल्यानंतर पर्स तपासली असता सोन्याची चैन व रोख रक्कम चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने आपल्या नातेवाईकांना दोंडाईचा बसस्थानक व दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे माहिती देण्यासाठी पाठवले, तर स्वतः पुढील सोनगीर पोलीस स्टेशन येथे एस.टी.ने जाऊन चोरीची माहिती दिली.अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने घडलेल्या या दोन घटनांमुळे बसस्थानकावरील सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थीत होत आहेत. बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही अशा प्रकारे चोरी होणे हे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंताजनक असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.
ही घटना केवळ चोरीपुरती मर्यादीत नसून प्रशासनातील उत्तरदायित्व आणि प्रामाणिकपणाबाबतही प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे. स्थानीक नागरीकांच्या मते, दोंडाईचा परिसरात विविध शासकीय विभागांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याची भावना वाढत आहे. नगरपालीकेकडे विकासकामे, निधीचा वापर किंवा इतर माहीती मागीतल्यास नागरीकांना वेळेत व समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार अनेकांकडून व्यक्त केली जाते.याशिवाय उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवांबाबतही नागरीकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येते. रुग्णांना आवश्यक तेवढा दर्जेदार उपचार मिळत नसल्याची तक्रार असताना, वैद्यकीय खर्च मात्र कोट्यवधी रुपयांमध्ये दाखवला जात असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. तसेच सार्वजनीक बांधकाम विभागाकडील विविध कामांची माहीती नागरीकांना सहज उपलब्ध होत नसल्याची तसेच अधिकारी कार्यालयात अनुपस्थीत असतात, अशीही तक्रार समोर येत आहे.वीज वितरण व्यवस्थेबाबतही नागरीकांनी प्रश्न उपस्थीत केले आहेत. वीज चोरी करणाऱ्यांवर अपेक्षीत कारवाई होत नसल्याचे चित्र असताना, नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांकडून मात्र काटेकोरपणे वसुली केली जाते, अशी भावना व्यक्त होत आहे. परिणामी प्रामाणीकपणे नियम पाळणाऱ्या नागरीकांनाच सर्वाधीक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.राजकीय क्षेत्राबाबतही नागरीकांमध्ये नाराजी दिसून येते.समाजसेवेच्या नावाखाली काही जण कमी वेळात स्वतःची आर्थिक प्रगती साधतात, मात्र सर्वसामान्य नागरीकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते, अशी टीका नागरीकांकडून केली जात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची भूमीका अत्यंत महत्त्वाची ठरते. कायद्याचे राज्य टिकवण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, तसेच प्रामाणीक नागरीकांना न्याय मिळेल अशी व्यवस्था उभी राहणेही तितकेच गरजेचे आहे. जर दोंडाईचा बसस्थानकावरील चोरी प्रकरणात सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन चोरी गेलेली रक्कम व सोन्याचे दागिने परत मिळवून दिले, तर नागरीकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, समाजातील सर्वच स्तरांवर प्रामाणीक-पणा, पारदर्शकता आणी जबाबदारीची भावना वाढवणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरीक व्यक्त करत आहेत.अन्यथा प्रशासनावरील व लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.सध्या या घटनांच्या निमित्ताने दोंडाईचा परिसरात एकच प्रश्न चर्चेत आहे- *“प्रामाणिकपणा खरोखरच संपत चाललाय का, की प्रामाणीक माणसालाच न्याय मिळणे कठीण होत चालले आहे?”*
0 Comments