सीआरपी विजया पवार, वंदना गिरासे, वैशाली साळुंखे यांच्याकडून सीसीटीव्हीसाठी ५ हजारांची मदत
डाबली-धांदरणे (ता. शिंदखेडा) : जागतिक महिला दिनानिमित्त डाबली-धांदरणे येथील जिल्हा परिषद शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महिला दिन उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद धुळेच्या माजी सभापती संजीवनी सिसोदे या होत्या.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समिती सदस्य वंदना गिरासे, सीआरपी विजया पवार, वैशाली साळुंखे, कविता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तिसरी-चौथीच्या विद्यार्थिनींनी ‘जन्म बाईचा गं’ या गाण्यावर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच पहिली ते तिसरीच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, राष्ट्रमाता जिजाऊ, झाशीची राणी, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती, पहिल्या महिला पंतप्रधान, पहिल्या महिला आयपीएस अधिकारी, मदर तेरेसा, मेरी कोम, कल्पना चावला, डॉ. आनंदीबाई जोशी आणि सानिया मिर्झा यांच्या व्यक्तिरेखा साकारत कर्तृत्ववान महिलांचे कार्य प्रभावीपणे सादर केले.
गावातील जिल्हा परिषद शाळेत लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या उपक्रमासाठी बचत गट प्रेरक विजया पवार, वंदना गिरासे व वैशाली साळुंखे यांनी पाच हजार रुपयांची रोख मदत माजी सभापती संजीवनी सिसोदे यांच्या हस्ते मुख्याध्यापक कैलास वाघ व शिक्षिका ममता सोनार यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच संजीवनी सिसोदे यांनी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थिनींना टिफिन बॅग भेट देऊन त्यांचा उत्साह वाढविला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक कैलास वाघ यांनी महिलांचे शिक्षण, सक्षमीकरण आणि सामाजिक सहभागाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमात सुंदर सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थिनी, आयोजक व देणगीदार महिलांचे संजीवनी सिसोदे यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षिका ममता सोनार यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगून उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी अंगणवाडी मदतनीस वर्षा गिरासे, पुष्पाबाई पाटील, बेबाबाई पाटील, जयश्री पाटील, जयश्री गिरासे, सुवर्णा कोळी, प्रियंका संकलेचा, सुनंदा पाटील, रेखाबाई गिरासे, शितल गिरासे, रेखाबाई सोनवणे, सरलाबाई गिरासे, प्रमिला पाटील, माया पाटील, जागृती पाटील, अनिता पाटील, निर्मला राजपूत, नागाबाबाई गिरासे, सोनल गिरासे, संगीता गिरासे, पुनम गिरासे, पुष्पा गिरासे, सुरेखा गिरासे यांच्यासह गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments