Header Ads Widget

*शिंदखेड्यात ‘नमो गार्डन’चे भूमिपूजन* ; *विकासासाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन* – *पालकमंत्री जयकुमार रावल*

शिंदखेडा (प्रतिनिधी) :
शिंदखेडा शहरातील वरूळ रोडवरील गोपालदास नगर येथे ‘नमो गार्डन’च्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. नगरपंचायतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रांमध्ये ‘नमो गार्डन’ उभारणीसाठी सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून शिंदखेडा येथे या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा कलावती माळी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष उदय देसले, बाजार समितीचे नारायण पाटील, प्रांताधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसीलदार नितीन देवरे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, समिती सभापती व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा कलावती माळी व गटनेते राकेश माळी यांच्या हस्ते ना. जयकुमार रावल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मंचावरील मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.
मनोगतात नगराध्यक्षा कलावती माळी यांनी, “निवडणुकीनंतर आता विकासाच्या कामांना गती देण्याची वेळ आली आहे. मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला खरे उतरून सर्वांनी एकदिलाने काम करावे,” असे आवाहन केले. तसेच शहराच्या विकासासाठी  ना रावल यांनी भरीव निधी मिळवून दयावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ना. जयकुमार रावल यांनी आपल्या भाषणात शहरातील पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, गटार, भूमिगत गटार, दलित वस्ती विकास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले स्मारकांच्या कामांचा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठीही पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले.
“नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही पक्षात ३६ चा आकडा होता, तो आता ३६ गुणात परिवर्तित व्हायला हवा. राजकारण आपल्या ठिकाणी, पण शहर विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे,” असे ना रावल म्हणाले. शहरासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ‘राजपथ’ योजनेतून शिवाजी चौक ते भगवा चौक दरम्यान रस्ता विकसित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 
मागील वर्षी झालेल्या वरूळ रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत नाराजी व्यक्त करत, “आतापर्यंत शहरासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्याचे योग्य नियोजन करून प्रशासनाने जबाबदारीने काम करावे,” असे निर्देशही त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रा. दिपक माळी यांनी केले.

Post a Comment

0 Comments