Header Ads Widget

*शिंदखेडा गॅस धारकांचा उद्रेक !भगवा चौकात चक्काजाम.*

 शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :- येथील गॅस एजन्सी मार्फत गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्याने ग्राहकांचा उद्रेक झाला. अक्षय तृतीया तोंडावर आलेली असताना देखील गेल्या आठ-दहा दिवसांपासून गॅस एजन्सी धारकाने आपले ऑफिस देखील उघडलेले नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. 
  या रागाचा परिणाम आज शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सुमारे एक हजार गॅस सिलेंडर धारकांनी भगवा चौकात चक्का जाम आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस आणि महसूल प्रशासन अनभिज्ञ राहिले.
   तथापि थोड्या वेळानंतर पोलिसांनी या चौफुलीवर येऊन आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र येत्या एक-दोन दिवसात जर ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळाले नाही, तर संपूर्ण गावभर याचा उद्रेक होऊन मोठे जन आंदोलन उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
   याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिंदखेडा शहरांमध्ये माणिक गॅस एजन्सी आणि अरुणाई गॅस एजन्सी या एच पी कंपनीच्या दोन गॅस एजन्सी आहेत. तसेच भारत गॅस एजन्सी चे देखील कार्यालय आहे. 
  माणिक गॅस एजन्सी यांचे अधिकृत कार्यालय नरडाणा या ठिकाणी आहे. त्यांचे शिंदखेडा शहरामध्ये कार्यालय आहे. नागरिकांनी संपर्क साधण्यासाठी कार्यालयात एका आठवड्यापासून येत आहेत. मात्र गेल्या आठ दिवसांपासून हे कार्यालय उघडलेले नाही. या कार्यालयाच्या बाहेर एक फलक लावून गॅस सिलेंडर घ्यायला कोणीही येण्याची गरज नाही, बुकिंग असलेल्या नागरिकांना घरपोच गॅस सिलेंडर मिळेल, असा बोर्ड लावलेला आहे. मात्र बुकिंग करून दहा ते पंधरा दिवस उलटल्यावर देखील आपल्याकडे गॅस हंडी न आल्याने या ग्राहकांनी गेल्या चार-पाच दिवसांपासून ऑफिसच्या समोर सिलेंडरची मोठी लाईन लावली आहे. खेडोपाडच्या अनेक नागरिकांनी पहाटे पाच वाजेपासूनच या ठिकाणी रांग लावायला सुरुवात केली आहे.
   आज अक्षय तृतीया तोंडावर आलेली असताना या ग्राहकांना  कार्यालय बंद असल्यामुळे कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्रस्त होऊन या नागरिकांनी भगवा चौकात आंदोलन केले.

 *हंडी परस्पर ब्लॅकमध्ये उपलब्ध !*
  या आंदोलनकर्त्यांनी गॅस सिलेंडरची गाडी येते तथापि सुर नदी ते टेमलाय फाट्याच्या  दरम्यान रस्त्यावर हॉटेल व्यावसायिक आणि अन्य व्हीआयपी कस्टमर यांना बोलवून त्या ठिकाणी सिलेंडर वाटप केले जाते. नागरिक पंचायत समितीच्या समोर मोठी रांग करून बसलेले असतात. त्यांच्यापर्यंत हे सिलेंडर पोहोचतच नाही, असा आरोप या नागरिकांनी केला आहे. अनेक हॉटेल  व्यवसायकांनी आणि व्हीआयपी ग्राहकांनी हे सिलेंडर दोन हजार रुपयापर्यंत परस्पर घेण्याचा उद्योग सुरू केला आहे.
   गॅस एजन्सी धारकांना वरच्या पैशांची कमाई होत असल्यामुळेच सामान्य ग्राहकांना गॅस हंडी उपलब्ध होत नसल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
   गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गॅस हंडी उपलब्ध होत नसताना शिंदखेडा शहरातील पुरवठा विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

*केवायसी साठी मोठी आर्थिक लूट !*
 गेल्या अनेक वर्षांपासून गॅस सिलेंडर सहज उपलब्ध होत असल्यामुळे अनेक नागरिकांनी ऑनलाईन बुकिंग न करता आपले गॅस सिलेंडर घेतले आहे. परिणामी त्यांना आता केवायसी करून घेणे आवश्यक केले आहे या गॅस एजन्सी ऑफिस मध्ये आपल्या कागदपत्रांची केवायसी करण्यासाठी ग्राहकांकडून मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचे समोर आले आहे केवायसी करण्यासाठी दीडशे ते दोनशे रुपये घेऊन गॅस धारकांना लूटले जात असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आहे अनेक गॅस ग्राहकांनी आपले मोबाईल नंबर बदलल्यामुळे त्यांचे केवायसी लवकर होत नाही याचा गैरफायदा घेत जास्त पैसे घेऊन नव्या मोबाईल नंबर वरून ऑनलाईन बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करून दिली जात आहे या सर्व गैरप्रकारांकडे पुरवठा विभागाने लक्ष द्यावे आणि नागरिकांना गॅस सिलेंडर त्वरित उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे.
   दरम्यान हिंदूंच्या सणांमध्ये महत्वाच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेलाच गॅस सिलेंडर नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments