शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
समाज विकासासाठी युवकांचे चरित्र निर्माण सर्वोच्च असून ते परिवार, शाळा व महाविद्यालयातून साधले जाते त्यासाठी शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचा संस्कार आहे असे प्रतिपादन प्रा. ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक यांनी कै. एम. डी. सिसोदे महाविद्यालय नरडाणा येथे केले.
दि. ०४ एप्रिल २०२६ रोजी राज्यस्तरी दलितमित्र प्राचार्य सी. आय. मोरे आदर्श प्राचार्य पुरस्कार २०२५-२६ ग्रामिण विकास शिक्षण प्रसारक मंडळ, नरडाणा संचालित कै. म. दि. सिसोदे उर्फ भाऊसाहेब कला, वाणिज्य व डॉ. सौ. यू. पी. तनपुरे विज्ञान आणि श्रीमती आर. एम. सिसोदे कनिष्ठ महाविद्यालय येथील प्राचार्य डॉ. प्रवीणसिंग सरदार गिरासे यांना लोकनेते विकासरत्न सरकारसाहेब रावल यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ विचारवंत प्रा. प्रकाशजी पाठक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळेस ते बोलत होते. याप्रसंगी जयहिंद शैक्षणिक संस्थेचे ज्येष्ठ संचालक डॉ. अरुण साळुंखे, ग्रामिण विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबासो. संजय मधुकरराव सिसोदे, ज्येष्ठ संचालिका संजीवनीताई सिसोदे, उपाध्यक्ष दादासो. सिद्धर्थ सिसोदे, संचालिका डॉ. युगंधरा सिसोदे, संचालक श्री. रविंद्र बोरसे, श्री. सी. एन. राजपूत, श्री. रतीलाल निकम, श्रीमती रेखा विलास सिसोदे, श्री. निशिकांत कोहक, संध्याताई कोहक, सौ. शुभांगीताई पाटील, प्रा. जस्पालसिंग सिसोदीया, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. मोहन चिंतामण मोरे, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रा. विलास चव्हाण, धुळे जिल्ह्यातील विद्यापीठ अधिसभा सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र परिवार, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
प्रा. पाठक पुढे म्हणले की, मी कार्यक्रमांना इव्हेंट न मानता संस्कार मानतो. आमचे गुरुवर्य प्राचार्य सी.आय. मोरे यांच्या सानिध्यात आल्यावर आम्हाला त्यांचे संस्कार आमच्यावर झाले. प्राचार्य सी. आय. मोरे आमच्यासारख्यांकडून चांगल्या गोष्टी करून घेत. पुरस्कार देताना प्रतिष्ठानला नावारुपास आणणे, सरांची पुन्हा आठवण करून देणे, आणि गुणी व्यक्तीला सन्मानित करणे या तीनही महत्त्वाच्या गोष्टी या पुरस्कार वितरण समारंभाचे प्रसंगी मला महत्त्वाच्या वाटतात. पुरस्कार मिळणे हा जसा आनंदाचा तसा जबाबदारी भाग आहे. व्यक्तिच्या गुणांचे कौतुक करणे सोपे असते. मात्र दोष दाखवण्यापेक्षा कृतीतून त्या व्यक्तीला चुकीचे काम करण्यापासून परावृत्त करणे ही एक साधना आहे. विद्यार्थ्यांना प्राचार्य व शिक्षकांनी मार्गदर्शन व आवश्यक मदत करणे म्हणजे त्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीन विकास करणे होय. ते काम आज या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरासे निष्ठापुर्वक अत्यंत तळमळीने व प्रसंगी पदरमोड करुन करीत आहेत ही समाधान देणारी बाब आहे. कोणत्याही संस्थेचा विकास संचालक मंडळाचे मार्गदर्शन व प्राचार्यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असतो. पद, पैसा, प्रतिष्ठा या दीर्घकाळ टिकणाऱ्या गोष्टी नाहीत. स्वार्थ, वर्चस्व, विध्वंस या शब्दांभोवती आज जग फिरते आहे. आज जगाला युद्धाची नाहीतर बुद्धाची गरज आहे.
अध्यक्ष सरकारसाहेब रावल म्हणाले, की ज्ञानार्जन करणारी लोक समाज घडवीत असतात. आजचा दिला गेलेला पुरस्कार हा प्राचार्य डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांच्या कर्तव्याप्रति असलेल्या निष्ठेचे दर्शन घडविणारा सोहळा आहे. सर उंचीने कमी असले तरी कर्तृत्व फार मोठे आहेत. पुरस्कारसाठी निवड ही फार स्तुत्य व उल्लेखनीय निकश लावून करण्यात आली आहे. डॉ. गिरासे सारख्या गुणी व्यक्तीची पुस्कारासाठी निवड करुन डॉ. मोहन मोरे, प्रा. विलास चव्हाण यांनी रत्नपारखीची भूमिका केली आहे. प्राचार्य डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांना आज राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला ही आमच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. त्यांनी रावळ परिवारातर्फे प्राचार्य डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांचे अभिनंदन केले.
श्री. सिद्धार्थ सिसोदे म्हणाले की, प्राचार्य डॉ. प्रवीणसिंग गिरासे सर हे नेहमी संस्थेच्या व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तन-मन-धनाने उभे असतात. जयहिंद सारख्या नावाजलेल्या संस्थेतून आले हा आमचा सन्मान आहे. शिस्तीच्या बाबतीत किंवा फी च्या बाबतीत काही गोष्टी आम्ही देखील सरांकडे सांगावयास धजत नाहीत. प्रसंगी गरीब विद्यार्थ्यांची फी स्वतः प्राचार्य भरून देत असतात.
बाबासो. संजय सिसोदे म्हणाले की, प्राचार्य सी.आय.मोरे यांचा शिंदखेडा महाविद्यालयातील कार्यकाळ आम्ही जवळून बघितलेला आहे. ते शिस्तीचे अतिशय भोक्ते होते, त्यांच्या नावाने दिलाजाणारा पुरस्कार हा जसा प्राचार्य डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांचा सन्मान आहे तसाच तो संस्थेच्या शिरोपेच्यात रोवलेला मानाचा तुरा आहे. प्राचार्य मोरे सरांचा वसा त्यांचे सुपुत्र प्रा. डॉ. मोहन मोरे चालवीत आहेत याचा संपूर्ण समाजाला अभिमान आहे.
.डॉ.अरुण साळुंके यांनी डॉ. गिरासे यांनी जयहिंदमध्ये संस्था व विद्यार्थ्यांसाठी केलेल्या निष्ठापुर्वक सेवचा उल्लेख करुन त्यांचे अभिनंदन केले. श्री. सी. एन. राजपूत यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
सत्कारमुर्ती प्राचार्य डॉ. गिरासे यांनी दलितमित्र प्रतिष्ठानने राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य म्हणून सन्मान केल्याबद्दल आभार मानले व स्वो. वि. संस्था दोंडाईचा, वालचंद महाविद्यालय सोलापूर, जयहिंद शैक्षणिक संस्था, धुळे यांनी प्राध्यापक म्हणून सेवेची दिलेली संधी व ग्रा. वि. शि. प्र. मंडळाने प्राचार्य म्हणून दिलेली सेवेची संधी व टाकलेला विश्वास याबद्दल आभार व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. मोहन चिंतामण मोरे यांनी केले, पुरस्काराची भूमिका प्रा. विलास चव्हाण यांनी मांडली, पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य प्रा. टी. एस. भामरे याने केला, स्वागत उपप्राचार्य डॉ. एन. के. पाटील यांनी, आभार उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील यांनी सादर केले तर सूत्र संचालन धनंजय दीक्षित यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
0 Comments