Header Ads Widget

वृथा उपचार नाही, वाघ परिवार असाश्‍वास बिनधास्त घेई, येथे निरागस ससा


धुळे शहरालगत मोराणे शिवारातील बालाजी नगरात 22 जुलै रोजी ज्येष्ठ समाजसेवक स्व. दादासाहेब भालचंद्र नथ्थु वाघ यांच्या प्रेरणा मार्गदर्शनाने सुरु असलेल्या यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक  महिला मंडळ धुळे संचलित श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह कार्यशाळेत प्रदेश धनगर समाज महासंघाचे नेते सुनिलबापू वाघ व भरतशेट वाघ बंधूंच्या पुढाकाराने व संस्थेच्या अध्यक्षा सौ. मंगलाताई सुनिल वाघ व सचिव सौ. मनिषाताई भरत वाघ यांच्या देखरेखीखाली याच संस्थेतील सुकन्या चि.सौ.कां. बिन्नी उर्फ शिवानी आणि चितोडरोडवरील उषाताई व गुलाब यशवंत वाघ यांचे चिरंजीव सागर यांचा विवाह समाजसेवक लखन गोराड यांच्या प्रयत्नाने जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, महापौर सौ. मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योतीताई पाटील, सभापती लताताई पोतदार, प्राचार्य डॉ. विष्णु गुंजाळ, श्रीमती, अरुणाताई भराडिया विविध विभागांचे शासकीय अधिकारी, बालाजी नगरचे रहिवासी, शहरातील विविध राजकीय पक्ष, नगरसेवक अमोल उर्फ बंटीभाऊ मासुळे, हिरामणआप्पा गवळी, सौ. अल्पाताई अनुप अग्रवाल, जयश्रीताई कुलकर्णी, सभापती उज्वलाताई ठाकरे, सभापती उषाताई साळुंके, अ‍ॅड. अनिताताई भामडेरे, सभापती सुरेखाताई पवार, पत्रसृष्टीतील सर्वश्री जीवनआबा शेंडगे, मनोज गर्दे, राजेंद्र गर्दे, अजय गर्दे, गोरख गर्दे, मनोज बैसाणे, दिलीप वाघ, तुषार परदेशी, राम निकुम, कल्पेश पाठक, मनोहर सोलंकी, सोपान देसले, रुपक बिरारी, संतोष दोरकर, दिपक वाघ, मनिष मासुळे, विरेंद्र मोरे, राजु कापडणीस, गोपाल कापडणीस धनंजय गाळणकर, राजेंद्र गुजराथी  यांच्यासह समग्र पत्रसृष्टी, समाजसेवी संघटनांच्या नेत्यांच्या उपस्थितीत संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बालगृहातील बिन्नीच्या सोबत सांगाती 106 बालिकांच्या उपस्थितीत शहरातील दानशुर सेवाव्रती मुथा, मंडोरे, शहा, अग्रवाल, भराडीया  परिवार आणि कन्यादानाची मानकरी सौ. रंजना रमेशजी शहा, सौ. शितल भावेशजी शहा यांच्या  संसारोपयोगी साहित्यासह महत्त्वपूर्ण योगदानाने सनई चौघड्यांच्या मंगलध्वनीत ख्यातनाम वृत्त निवेदक जगदीशदादा देवपुरकर यांच्या बहारदार निवेदनात थाटामाटात संपन्न झाला.

म. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबा व साधनाताई आमटे, डॉ. अभय बंग दाम्पत्य यांनी केलेल्या विधायक कामाची आठवण यावी असे ऋषितुल्य वाघ दाम्पत्य व संस्थेतील तपस्वी शिक्षक-शिक्षकेतर, स्वयंपाकी कर्मचार्‍यांचे प्रयत्न याची देही, याची डोळा पाहुन उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून कौतुक केले. वाघ परिवाराच्या योगदानासोबतच कौतुकाची बाब अशी की संस्थेच्या स्वयंपाकी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी बिन्नीला आपली मुलगी समजून तिच्या संसाराला हातभार म्हणून संसारोपयोगी साहित्यासाठी स्वखुशीने आपल्या पगारातून योगदान दिले. या संस्थेतील हा दुसरा विवाह. दीड तपापूर्वी सुनिता नावाच्या एका कन्येचा फागणे येथील शर्मा कुटुंबातील वैभय या तरुणाशी विवाह लावून दिला. विशेष म्हणजे ही मुलगी देखील आपल्या बालकासह विवाह सोहळ्यास उपस्थित होती. कुणीही अनाथ राहु नये व त्यांना परिवार मिळावा असा वाघ परिवाराचा प्रयत्न असतो. मुलगी सामान्य परिस्थितीत आली की, डॉ. जीवन पवार यांच्या सहकार्याने वैद्यकीय पद्धतीने तपासणी करून सर्व शासकीय प्रक्रिया पार पाडून विवाह लावून दिला जातो. नवरदेव सागराप्रमाणे विशाल असलेल्या सागर वाघाचे नक्कीच कौतुक केले पाहिजे, त्याचे धैर्य अविवाहित तरुणांनी आदर्श घ्यावा असेच आहे. माझ बालपण शिवाजीनगर झोपडपट्टीत गेल्याने पूर्वी आमच्या गल्लीतच राहणारा वाघ परिवार मला ज्ञात आहे. कुणी मिल कामगार तर कुणी हमाली करणार, सर्वच वाघ परिवार कष्टाळु आणि श्रमदेवतेचे पुजारी. तोच वारसा समाजसेवक लखन गोराड यांच्या मार्गदर्शनाखाली आग्रारोड व बॉम्बे लॉज चौकात भाजी पाला विकून सागर  उदरनिर्वाह चालवितो. अवघ्या आठवड्यात त्याने लग्नाची तयारी केली आणि नागपुर येथुन न्यायालयाच्या आदेशाने अनाथ दु:ख घेऊन आलेल्या वाघांच्या संस्थेतील कन्येला तिचा भूतकाळ न पाहता तिचा जोडीदार म्हणून स्विकार केला आणि मायेची ऊब दिली याला वाघाचे काळीज लागते ते सागर वाघाने भावनेने सिद्ध करून दाखविले. विवाह संपन्न झाल्यावर उषाताई व गुलाबराव सह समस्त सागरच्या वाघ परिवाराच्या चेहर्‍यावर समाधान कृतकृत्य भाव दिसत होता. बिन्नीचे मामा म्हणून संस्थेतील कर्मचारी सुरेश ढिवरे उभे राहिले. आणि भाचीचे लग्न समजून त्यांनी सर्वत्र निमंत्रणाचे वाटप केले होते.

24 डिसेंबर 16 रोजी नातवाच्या विवाहप्रसंगी  दादासाहेब भालचंद्र वाघ यांना मध्यरात्री अस्वस्थ वाटू लागले त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांना जवळ बोलाविले आणि स्पष्ट शब्दात सांगितले, “अरे हा देह नाशवंत आहे एक दिवस सर्वांनाच जावे लागते. तुम्ही सत्कर्म करा, नामस्मरण करा सर्व ठीक होईल. आणि आपल्या वडीलांचे हे बोल प्रमाण मानत वाघ परिवाराने कधीच मागे वळून पाहिले नाही. या जन्मात येणारा चांगले आयुष्य घेऊनच जन्माला येतो असे नाही. निसर्गत:च कमी बुद्धी असलेल्यांना त्यांचे कुटुंबियही नाकारते. केवळ मानवतेच्या समाजातील  या दुर्लक्षित घटकाकडे रुग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा समजून गेली दीड तप कार्यरत राहून ज्यांना आपल्या जीवनाचे आकलन होत नाही अशा अनाथ निराधार मुलींच्या जीवनात जीवन जगण्याची कला निर्माण करण्याचा वाघांच्या या संस्थेत स्तुत्य प्रयत्न सुरु आहेत.  सुनिलबापू वाघ यांना “पप्पा चहा घेता का? औषधे घेतली का? नाश्ता आणून देऊ का? असा आग्रह करणारी ‘बिन्नी’ असा आपल्या मनोगतातून सुनिलबापूंनी उल्लेख करताच संस्थेची ‘माय’ यमुनाई सह संपूर्ण वाघ परिवार संस्थेतील मुली, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित मान्यवर समुदाय बालाजी नगरवाले आपले अश्रू रोखू शकले नाहीत. हीच खरी वाघांच्या कार्यकतर्र्ृत्वाची पावती होय. निखील वाघ यांचीही धडपड वाखाणण्याजोगी होती. आडनाव ‘वाघ’ असले तरी संस्थेत निरागस निराधार ‘ससे’ सांभाळणे हे आश्‍चर्य नाही काय?  सामुदायिक मिष्टान्न भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

‘येथे मानव्याशी नातं, दिसे काळजात ओलं,

येथे कर्तृत्वात आहे, मानव्याचं मोल

हाच खरोखर आहे , त्यांचा वेगळा तो ठसा,

जगण्यात रुजविला , सदा सेवाभावी वसा.’

- गो.पि. लांडगे,

ज्येष्ठ पत्रकार, धुळे

94227 95910

 

****

Post a Comment

0 Comments