प्रतिनिधी | शिंदखेडा
शिंदखेडा तालुक्यातील हजारो बांधकाम कामगारांना
केवळ नोंदणी व शासकीय कामांसाठी वारंवार दोंडाईचा येथे जावे लागते. यामुळे वेळ आणि पैशाचा मोठा अपव्यय होतो. कामगारांना त्यांच्या हक्काच्या योजना स्थानिक पातळीवर सहज मिळाव्यात, यासाठी शिंदखेडा शहरात कायमस्वरूपी डी.ओ.सी. कार्यालय सुरू करणे ही काळाची गरज आहे. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना बांधकाम कामगार सेना तीव्र आंदोलन उभारेल."
भूषण अभिमन्यू पवार
तालुकाप्रमुख, शिवसेना बांधकाम कामगार सेना, शिंदखेडा
शिंदखेडा तालुक्यातील बांधकाम कामगारांची गैरसोय दूर करण्यासाठी शिंदखेडा शहरात डी.ओ.सी. (डॉक्युमेंटेशन व नोंदणी) कार्यालय तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात धुळे जिल्हाधिकारी तसेच सरकारी कामगार अधिकारी यांना निवेदन देत शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
निवेदनात शिंदखेडा तालुक्यातील हजारो बांधकाम कामगारांना नोंदणी, नूतनीकरण, विविध शासकीय योजनांचे अर्ज व इतर कामांसाठी वारंवार दोंडाईचा येथे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांचा वेळ व आर्थिक खर्च वाढत असून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाबही निवेदनातून मांडण्यात आली.शिंदखेडा शहरात डी.ओ.सी. कार्यालय सुरू केल्यास तालुक्यातील कामगारांना स्थानिक पातळीवरच सर्व सेवा उपलब्ध होतील. तसेच ग्रामीण भागातील कामगारांची गैरसोय टाळण्यासाठी कुंडाणे किंवा निमडाळे येथे सुविधा केंद्र सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली.यावेळी बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष सुदाम शिरुडे, उपजिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील, जिल्हा संघटक भालचंद्र पाटील, शिंदखेडा तालुकाप्रमुख भूषण पवार, तालुका उपप्रमुख सचिन चौधरी, धुळे तालुकाप्रमुख अविनाश शेलार, उपतालुकाप्रमुख नितीन पाटील, शिरपूर तालुका उपप्रमुख सुभाष पावरा, संघटक राजाराम पावरा, धुळे जिल्हा कोषाध्यक्ष राजेंद्र पारधी, धुळे उपप्रमुख मोहन खैरनार, संघटक विकास गिरासे, संघटक महेंद्र वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.निवेदनावर सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या असून, शासनाने मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
0 Comments