भडणे | प्रतिनिधी :
अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन मंडळ, श्रीक्षेत्र जाळीचा देव यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय श्रीमद् भगवद्गीता ज्ञानस्पर्धा परीक्षा भडणे येथील कै. सी. बी. देसले विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यालयातील परीक्षा केंद्रावर एकूण ५४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला.जिल्हा संपर्क प्रमुख बी एल सोनवणे व केंद्रप्रमुख संजयकुमार महाजन यांनी परीक्षेचे आयोजन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. ए. वाडिले यांच्या हस्ते परीक्षा दालनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण वातावरणात उत्स्फूर्तपणे परीक्षेत सहभाग घेतला.
श्रीमद्भगवद्गीता घराघरात पोहोचविणे, भारतीय संस्कार व नीतीमूल्यांच्या शिक्षणाचा प्रसार करणे, विद्यार्थ्यांना आपल्या धर्म व संस्कृतीची माहिती करून देणे तसेच संस्कारक्षम, राष्ट्रभक्त तरुण-तरुणी घडविणे,
भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून उत्तम जीवन जगण्याचा मार्गदर्शक ग्रंथ आहे. गीतेचे विचार विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संयम, कर्तव्यभावना आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतात. हा या ज्ञानस्पर्धा परीक्षेचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रसंगी ज्येष्ठ अध्यापिका संगीता वेंदे,रावसाहेब बैसाणे, सारंग पाटील, मनोहर पाटील, जितेंद्र अहिरे, निशांत शिंदे, एन. एस. पाटील यांची उपस्थिती होती.
परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती अलका सूर्यवंशी, शरद पवार व निलेश पवार यांनी अमूल्य सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याने विद्यालय परिसरात आध्यात्मिक व संस्कारमय वातावरण निर्माण झाले होते.
भगवान श्रीकृष्णांनी दिलेला कर्माचा संदेश प्रत्येक विद्यार्थ्याला जीवनात योग्य दिशा देणारा आहे.
ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी निश्चितच उपयुक्त आहे.
आयोजकांनी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा आहे - एस ए वाडिले,मुख्याध्यापक
0 Comments