Header Ads Widget

बापाची किंमत फक्त ५१०० रुपये? जन्मदात्याच्या अंत्यसंस्कारालाही मुलींची पाठ; मोबाईलवरून पैसे पाठवून नात्यांची इतिश्री!



   ज्या हातांनी धरून आपण चालायला शिकलो, ज्या खांद्यावर बसून संपूर्ण जग पाहिले आणि ज्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबावर आपल्या भविष्याची इमारत उभी राहिली, त्याच बापाच्या आयुष्याची अखेरची किंमत अवघी ५,१०० रुपये ठरवावी? सोनीपत येथील वृद्धाश्रमात घडलेली ही घटना केवळ एका हताश बापाची शोकांतिका नाही, तर माणसाच्या काळजाला पडलेले कधीही न भरणारे भलेमोठे भोक आहे. आयुष्यभर स्वतःच्या सर्व इच्छा-आकांक्षांना मूठमाती देऊन, रक्ताचे पाणी करत ज्या बापाने आपल्या लेकींना शिकवले, समाजात मानाचे स्थान मिळवून दिले, त्याच बापाला आयुष्याच्या संध्याकाळी एकाकी सोडून देताना त्या हातांना किंचितही कंप सुटू नये? आणि त्याच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी प्रत्यक्ष येण्याऐवजी मोबाईलच्या थंडगार स्क्रीनवरून व्हिडिओ कॉल लावून ५,१०० रुपये ट्रान्सफर करून मोकळे व्हावे? हा केवळ बापाचा अनादर नाही, तर मानवतेच्या तोंडावर मारलेली एक चपराक आहे.

     आज आपण प्रगतीची, आधुनिकतेची आणि यशाची शिखरे पादाक्रांत करत आहोत, पण या चकचकाटात आपण आपले मन आणि संवेदना पार गमावून बसलो आहोत का, हा प्रश्न स्वतःला विचारायची वेळ आली आहे. ज्या बापाने मुलांच्या चेहऱ्यावरील हसण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी केली, त्याला शेवटच्या क्षणी मुलांचा एक स्पर्श, एक मायेचा शब्द आणि सन्मानाची अंत्ययात्राही मिळू नये, यापेक्षा मोठे दुर्दैव जगाच्या पाठीवर काय असू शकते? आपण बनवलेले डिजिटल जग कितीही पुढे गेले, तरी ते मोबाईलच्या एका क्लिकवर बापाच्या प्रेमाची आणि त्या त्यागाची भरपाई कधीच करू शकणार नाही. ५,१०० रुपयांची ती डिजिटल पावती म्हणजे आधुनिक युगात नात्यांचा झालेला हा एक भयानक सौदाच वाटतो.

   माणसाचे आयुष्य हे शेवटी स्वतःसाठीच असते, म्हणूनच प्रत्येकाने स्वतःचे आयुष्य स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी जरूर जगले पाहिजे. स्वतःची स्वप्ने पूर्ण करणे, करिअर घडवणे आणि स्वतःचे अस्तित्व टिकवणे यात काहीही चुकीचे नाही. परंतु स्वतःसाठी जगणे म्हणजे स्वार्थी होणे नव्हे, किंवा आपल्या माणसांच्या बलिदानावर स्वतःच्या सुखाचा महाल उभारणे नव्हे. स्वतःच्या आनंदाचा शोध घेताना जर आपण आपल्या जन्मदात्यांचे अश्रू दुर्लक्षित करत असू, तर त्या जगण्याला काहीही अर्थ उरत नाही. स्वतःसाठी जरूर जगा, पण इतरांचे मन दुखून किंवा नात्यांची माती करून मिळवलेला आनंद कधीच दीर्घकाळ टिकू शकत नाही.

     ​या हृदयद्रावक घटनेतून आपल्याला सर्वात मोठा धडा हाच मिळतो की, आयुष्य स्वतःसाठी नक्कीच जगा, स्वतःची स्वप्ने पूर्ण करा, यश मिळवा; पण हे सर्व करताना ज्यांच्यामुळे आपण आज इथे आहोत, त्या जन्मदात्यांना कधीही विसरू नका. यश, पैसा आणि पद हे सगळे तात्पुरते आहे, पण आई-वडिलांचे छत्र एकदा हरवले की ते जगातील सर्व संपत्ती मोजूनही परत मिळवता येत नाही. आपण आपल्या आयुष्याच्या धावपळीत इतकेही आंधळे होऊ नये की, आपल्याच माणसांचे अस्तित्व आपल्याला ओझे वाटू लागावे. पैशाने जगातील सर्व सोयी-सुविधा विकत घेता येतील, पण बापाच्या मायेचा स्पर्श आणि आईचे प्रेम कोणत्याही ऑनलाईन ट्रान्सफरने विकत घेता येत नाही.


  ​या हृदयद्रावक घटनेतून आपल्याला सर्वात मोठा धडा हाच मिळतो की, आयुष्य स्वतःसाठी नक्कीच जगा, स्वतःची स्वप्ने पूर्ण करा, यश मिळवा; पण हे सर्व करताना ज्यांच्यामुळे आपण आज इथे आहोत, त्या जन्मदात्यांना कधीही विसरू नका. यश, पैसा आणि पद हे सगळे तात्पुरते आहे, पण आई-वडिलांचे छत्र एकदा हरवले की ते जगातील सर्व संपत्ती मोजूनही परत मिळवता येत नाही. आपण आपल्या आयुष्याच्या धावपळीत इतकेही आंधळे होऊ नये की, आपल्याच माणसांचे अस्तित्व आपल्याला ओझे वाटू लागावे. पैशाने जगातील सर्व सोयी-सुविधा विकत घेता येतील, पण बापाच्या मायेचा स्पर्श आणि आईचे प्रेम कोणत्याही ऑनलाईन ट्रान्सफरने विकत घेता येत नाही.

    ​ही घटना केवळ एक बातमी वाचून विसरून जाण्यासाठी नाही, तर प्रत्येकाने स्वतःच्या आत्म्याला विचारण्याचा एक गंभीर प्रश्न आहे. आई-वडिलांना उतारवयात कोणत्याही महागड्या वस्तूंची किंवा वृद्धाश्रमातील सोयींची गरज नसते, त्यांना गरज असते ती फक्त आपल्या प्रेमाची, सहवासाची आणि सन्मानाची. नात्यांपेक्षा जेव्हा पैसा आणि सोय महत्त्वाची वाटू लागते, तेव्हा माणूस म्हणून आपण पूर्णपणे अपयशी ठरलेले असतो. म्हणूनच, वेळ निघून जाण्यापूर्वी स्वतःला सावरा, आपल्या आई-वडिलांना मायेने जवळ करा आणि त्यांना त्यांच्या हक्काचा मान आणि सहवास द्या; कारण बापाच्या प्रेमाची किंमत जगातला कोणताही पैसा कधीच करू शकत नाही.

*प्रा.राजश्री पाटील*
         *सुरत*

Post a Comment

0 Comments