Header Ads Widget

*नरडाणा येथील सिसोदे महाविद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*

​शिंदखेडा (यादवराव सावंत, प्रतिनिधी):
ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ, नरडाणा संचलित कै. भाऊसाहेब एम. डी. सिसोदे कला, वाणिज्य व डॉ. सौ. उषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान महाविद्यालय तसेच श्रीमती आर. एम. सिसोदे कला कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचा अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष (IQAC) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
​कार्यक्रमाच्या सुरुवातीला महान स्वातंत्र्यसेनानी, आदिवासी जननायक आणि समाजसुधारक वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरासे यांनी भूषवले.
​ *वीर बिरसा मुंडा यांच्या ‘उलगुलान’ आंदोलनाचा आढावा* 
मुख्य वक्त्यांच्या मनोगतात प्रा. डी. एस. ढिवरे यांनी वीर बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यात अत्यंत गरिबीत जन्मलेल्या बिरसा मुंडा यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कूलमध्ये झाले. आदिवासी समाजात त्यांना अत्यंत आदराने 'धरती आबा' (जगाचे पिता) मानले जाते. ब्रिटिशांच्या अन्यायकारक जमीन महसूल धोरणांविरुद्ध आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मांतराविरुद्ध त्यांनी पुकारलेला 'उलगुलान' उठाव हा भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे."
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गिरासे म्हणाले, "लोकनायक वीर बिरसा मुंडा यांच्या महान कार्याच्या सन्मानार्थ १५ नोव्हेंबर २००० रोजी स्वतंत्र झारखंड राज्याची निर्मिती करण्यात आली. तसेच केंद्र सरकारतर्फे हा दिवस संपूर्ण देशात 'जनजातीय गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो." याप्रसंगी त्यांनी वीर बिरसा मुंडा यांच्यासह तंट्या भिल, खाज्या नाईक आणि राणी दुर्गावती या आदिवासी क्रांतिकारकांच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील व सामाजिक योगदानाचा गौरव केला.
​प्रमुख उपस्थिती आणि परिश्रम
या सोहळ्याला उपप्राचार्य डॉ. यु. जी. पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. टी. भामरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. आर. ओ. पाटील, प्रतिमापूजन समिती संयोजक प्रा. अनिता मोरे, सदस्य प्रा. एस. आर. पाटील, प्रा. प्रभावती बागुल, प्रा. राहुल भदाणे, प्रा. देवेंद्र पाटील, प्रा. आर. एस. जाधव, प्रा. एस. एम. राजपूत, प्रा. शुभम सांगळे, प्रा. स्वप्निल मोरे, प्रा. हर्षा पाटील, प्रा. रोहिणी सिसोदे तसेच शिक्षकेतर कर्मचारी  संजय बोरसे, शैलेंद्र सिसोदे व शंकर सिसोदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments