Header Ads Widget

*डालडा घरकुल येथे गटारी तुंबल्याने नागरिक हैराण; प्रभागातील नगरसेवक आणि नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष*


 दोंडाईचा : जुना शहादा रस्त्याला लागून डालडा घरकुल परिसर हा सर्व जाती धर्मातील गरीब आणि हातावर पोट असणारे लोक येथे वास्तव्य करतात यात मजूर,फेरीवाले, छोटे व्यावसायिक,रिक्षाचालक आणि घरकाम करणारे लोक या वस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राहतात.          डालडा घरकुल प्रभाग क्रमांक 1 मध्ये गेल्या काही दिवसापासून गटारी पूर्णपणे तुंबल्या असून आरोग्याच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नगरसेवक आणि नगरपालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. गटारींचे घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियासारखे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. परिसरात चोवीस तास पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांना घरात राहणे आणि रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. तुंबलेले पाणी रस्त्यावर साचून राहिल्यामुळे रस्ते खराब होत आहेत आणि पादचाऱ्यांना चालताना त्रास होत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेचा सर्वात महत्त्वाचा आणि नागरिकांच्या थेट संपर्कात असणारा दुवा म्हणजे 'नगरसेवक'. आपल्या भागाचा विकास व्हावा, नागरी समस्या सुटाव्यात या अपेक्षेने नागरिक मतदानाचा हक्क बजावून नगरसेवकाला निवडून देतात. मात्र, दोंडाईचा नगरपालिका बिनविरोध होऊन नगरसेवक हे थेट जनतेला लादले गेले आहेत.नगरसेवक हा प्रभाग किंवा शहराचा मालक नसून तो जनतेच्या प्रतिनिधी असतो मुळात हीच भावना नाहिशी झाली आहे.ही केवळ राजकीय अनास्था नसून नागरिकांच्या हक्कांची गळचेपी आहे.आता तरी झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रभागातील नगरसेवक व दोंडाईचा नगरपालिकेचे आरोग्य विभागातील अधिकारी यांनी वेळेत उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून करण्यात आली आहे.नागरिकांना मूलभूत सुविधांसाठीही मनस्ताप सहन करावा लागणं म्हणजे दुर्दैवी आहे.नगरपालिका प्रशासनाने आणि स्थानिक नगरसेवकांनी तात्काळ या समस्येची दखल घेऊन गटारींची स्वच्छता करावी, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

 *आण्णा कोळी,दोंडाईचा*

Post a Comment

0 Comments