शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
तालुक्यातील विविध विकासकामे अपूर्ण ठेवल्याप्रकरणी आणि कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. सुभाष नागो माळी यांनी नगरपंचायत प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आपले अन्नत्याग उपोषण तात्पुरते १५ दिवसांसाठी स्थगित केले आहे.
सुभाष माळी यांनी २९ जून २०२६ रोजी नगरपंचायतीकडे दिलेल्या तक्रार अर्जात शहरातील प्रलंबित व अपूर्ण कामांचा पाढा वाचला होता. या कामांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने त्यांनी अन्नत्याग उपोषणाचा इशारा दिला होता.
उपोषणाच्या दिवशी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने विपुल साळुंखे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सुभाष माळी यांना प्रशासनाचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, "तक्रार अर्जाच्या अनुषंगाने प्रलंबित विकासकामे विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारांना ताकीद देण्यात येत आहे. तसेच, त्यांनी आतापर्यंत केलेल्या संपूर्ण कामांची सखोल तपासणी केली जाईल. या चौकशीत जे ठेकेदार दोषी आढळतील, त्यांच्यावर नियमानुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल." प्रशासनाने दिलेल्या या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रशासनाच्या या भूमिकेनंतर सुभाष माळी यांनी नगरपंचायतीला १५ दिवसांची मुदत देत आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले. "येत्या १५ दिवसांत या प्रलंबित प्रश्नांवर योग्य ती कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडू," असा इशारा त्यांनी या वेळी दिला.
या प्रसंगी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी नगराध्यक्षा कलावती माळी, गटनेते राकेश माळी, रजुताई माळी, कमलताई पाटोळे, पुष्पा सोनवणे, सुनीता देसले, प्रा. दीपक माळी, अर्जुन भिल, दीपक अहिरे, राहुल पाटोळे, अरुण देसले यांच्यासह नगरपंचायतीचे इतर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या.
0 Comments