Header Ads Widget

*गटारी अमावास्येला दोंडाईचा ‘गराडामां’- खवय्यांच्या ताटापेक्षा आरोग्याचा प्रश्न मोठा...*



*अन्नसुरक्षा व भेसळ नियंत्रण विभागाच्या धडक कार्यवाहीचा परीणाम...*

*चिकन-मटण, हॉटेल-खानावळ आणि खाद्यपदार्थांच्या व्यवसायांना अचानक ब्रेक, ग्राहकांमध्ये मात्र जागृतीची नवी चर्चा...*

*जनमत-संपादकीय विशेष-ॲड.दौलतराव सुर्यवंशी*

*दोंडाईचा-*
शहरात गटारी अमावास्या म्हटली की मांसाहारी पदार्थ, चिकन-मटण, विविध खाद्यपदार्थ आणि मद्यपानाचा बेत हा अनेकांच्या दृष्टीने जणू परंपरेचा भागच बनला आहे. मात्र यंदाची गटारी अमावास्या दोंडाईचाकरांसाठी वेगळाच संदेश देऊन गेली. कारण, त्याच्या आदल्या दिवशी अन्नसुरक्षा व भेसळ नियंत्रण विभाग, धुळे यांच्या पथकाने दोंडाईचा शहर व परीसरात दिवसभर केलेल्या धडक तपासणीचा परीणाम बाजारपेठेवर आणि ग्राहकांच्या मानसिकतेवरही स्पष्टपणे जाणवला.ऐरवी गटारी अमावास्येच्या दिवशी ज्या ठिकाणी चिकन-मटण विक्री केंद्रे, हॉटेल-खानावळी, चिकन चिलीच्या हातगाड्या आणि खाद्यपदार्थांच्या ठिकाणी ग्राहकांची झुंबड दिसायची, तेथे यंदा अनेक ठिकाणी अनपेक्षीत शांतता दिसून आली. काही व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवणे पसंत केले. यामुळे खवय्या ग्राहकांची काही प्रमाणात संताप-गराडामां-निराशा झाली, मात्र याच घटनेने एका अधिक गंभीर प्रश्नाला जन्म दिला-जर अन्नाच्या गुणवत्तेबाबत भीती नसती, तर तपासणीच्या दिवशी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ का यावी? हा प्रश्न केवळ एका दिवसाचा नाही. हा प्रश्न ग्राहकांच्या आरोग्याशी, अन्नाच्या गुणवत्तेशी आणि कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधीत आहे.

*‘आज दुकान बंद, मग कालपर्यंत ताटात काय वाढले जात होते?’...*
गटारी अमावास्येला नेहमीप्रमाणे चिकन-मटण किंवा खाद्यपदार्थ मिळाले नाहीत म्हणून काही ग्राहक नाराज झाले असतील. परंतु चाणाक्ष ग्राहकांनी मात्र या परीस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहिले. त्यांच्या मनात एक अस्वस्थ करणारा विचार आला-“कालपर्यंत आपण जे खात होतो, त्याची गुणवत्ता आपण कधी तपासली का?” तेल, मसाले, खाद्यपदार्थ, साठवणूक, स्वच्छता, कालबाह्य किंवा निकृष्ट साहित्याचा वापर यांसारख्या बाबी केवळ कागदावरील नियम नाहीत. त्या थेट मानवी आरोग्याशी जोडलेल्या आहेत. एखाद्या व्यक्तीने कष्टाची कमाई खर्च करून विकत घेतलेल्या अन्नातून पोषणाऐवजी आरोग्याला धोका मिळाला, तर त्याचे नुकसान केवळ त्या एका जेवणापुरते मर्यादीत राहत नाही.ताटात वाढलेले अन्न दिसायला आकर्षक असू शकते, पण त्यामागची गुणवत्ता संशयास्पद असेल तर ते अन्न नसून आरोग्यावरचा अदृश्य हल्लाच ठरू शकतो.

*एका दिवसाच्या कार्यवाहीने अनेक वर्षांचा प्रश्न उघडकीस?...*
अन्नसुरक्षा व भेसळ नियंत्रण विभागाच्या कार्यवाहीचा उद्देश व्यापाऱ्यांना त्रास देणे हा नसून, कायद्याचे पालन करून नागरीकांना सुरक्षीत अन्न उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे प्रामाणिक, नियमांचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. उलट अशा कार्यवाहीमुळे कायदेशीर पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे संरक्षणच होते.मात्र कार्यवाहीच्या भीतीने काही ठिकाणी व्यवसायच बंद राहीला असेल, तर प्रशासनाने त्या घटनांकडे केवळ ‘दुकाने बंद होती’ म्हणून न पाहता अन्नसुरक्षा व्यवस्थेच्या व्यापक दृष्टीने त्याचे परीक्षण करणे आवश्यक आहे.कारण कायद्याचा धाक हा प्रामाणिक व्यापाऱ्यांसाठी भीतीचा नसून संरक्षणाचा असतो, आणि नियम मोडणाऱ्यांसाठी तो इशारा असतो.

*ग्राहकांनीही आता ‘चव’ नव्हे, ‘गुणवत्ता’ मागावी...*
दोंडाईचाकरांच्या डोळ्यांसमोर या कार्यवाहीने एक आरसा धरला आहे. आपण पदार्थाची चव, किंमत आणि प्रमाण पाहतो, पण तो पदार्थ कोणत्या तेलात तयार झाला, कच्चा माल कसा साठवला, स्वच्छतेचे नियम पाळले जातात का, खाद्यपदार्थांची गुणवत्ता काय आहे-हे प्रश्न किती ग्राहक विचारतात?

आज एखाद्या दुकानात गर्दी कमी झाली म्हणून ती घटना संपत नाही. उलट ग्राहकांनी “स्वस्त आहे का?”याबरोबरच “सुरक्षीत आहे का?” हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

*प्रशासनाची धडक मोहीम कौतुकास्पद, पण ती ‘एकदिवसीय’ नको...*
धुळे अन्न व औषध प्रशासनाने केलेली कार्यवाही ही स्वागतार्ह आहे. मात्र नागरीकांची अपेक्षा एवढीच आहे की, अशी मोहीम एखाद्या घटना-सणाच्या पार्श्वभूमीवर एक-दोन दिवसांपुरती मर्यादीत राहू नये.गटारी अमावास्या गेली म्हणून अन्नभेसळीचा प्रश्न संपत नाही. सण संपला म्हणून नागरीकांचे आरोग्य धोक्यात येणे थांबत नाही.धडक कार्यवाही सातत्याने, अचानक आणि निष्पक्षपणे झाली तरच तिचा खरा परीणाम दिसेल.

आज एका व्यापाऱ्याची तपासणी झाली, उद्या दुसऱ्याची होईल आणि परवा तिसऱ्याची-असा कायद्याचा सातत्यपूर्ण संदेश बाजारपेठेत गेला, तर नियम पाळण्याची संस्कृती निर्माण होईल.

*व्यापाऱ्यांसाठीही स्पष्ट संदेश..*
दोंडाईच्यातील सर्व व्यापारी दोषी आहेत, असा निष्कर्ष काढणे अन्यायकारक ठरेल. अनेक व्यापारी प्रामाणिकपणे आणि नियमांचे पालन करून व्यवसाय करीत असतात. अशा व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.कारण अन्नसुरक्षितता ही व्यापारी विरुद्ध प्रशासन अशी लढाई नसून,व्यापारी-प्रशासन-ग्राहक या तिन्ही घटकांची संयुक्त जबाबदारी आहे.व्यवसाय करा, नफा कमवा; पण ग्राहकाच्या आरोग्याच्या किंमतीवर नाही.

*‘गटारी’ची खरी शिकवण...*
गटारी अमावास्येला चिकन-मटण मिळाले नाही म्हणून नाराज झालेला ग्राहक हा एक दिवसाचा विषय आहे, पण निकृष्ट किंवा भेसळयुक्त अन्नामुळे एखाद्या कुटुंबाचे आरोग्य बिघडले तर त्याची किंमत वर्षानुवर्षे मोजावी लागू शकते.म्हणूनच यंदाची गटारी अमावास्या दोंडाईचासाठी केवळ खाण्यापिण्याचा दिवस ठरला नाही. तिने ग्राहकांना एक महत्त्वाचा धडा दिला आहे-ताट भरलेले असण्यापेक्षा ते सुरक्षीत असणे महत्त्वाचे आहे.

कालपर्यंत गजबजलेल्या खाद्यपदार्थांच्या ठिकाणी आलेली शांतता काहींसाठी ‘व्यवसाय ठप्प’ असू शकते, पण जागरूक ग्राहकांसाठी ती ‘आरोग्याच्या प्रश्नावर सुरू झालेली नवी चर्चा’ आहे.

*आता दोंडाईचाकरांनी प्रशासनाला एकच मागणी करावी...*
कार्यवाही थांबू नये, तपासणी थांबू नये आणि ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी.कारण शेवटी प्रश्न चिकनचा नाही, मटणाचा नाही, तेलाचा नाही, हॉटेलचा नाही-प्रश्न आहे तो दोंडाईचाकरांच्या ताटातील अन्न सुरक्षीत आहे की नाही, याचा. आणि या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक ग्राहकाला मिळालेच पाहीजे.

Post a Comment

0 Comments