शिंदखेडा (यादवराव सावंत, प्रतिनिधी) :
शिंदखेडा शहरातील विविध विकासकामांची मुदत संपूनही कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करावी, या मुख्य मागणीसाठी तसेच पाणीपुरवठा योजनेच्या कारवाईसाठी नेमलेल्या समितीची चौकशी रखडल्याच्या निषेधार्थ, श्री सुभाष नागो माळी हे उद्या, शुक्रवार (दि. १४ ऑगस्ट २०२६) पासून शिंदखेडा नगरपंचायतीसमोर अन्नत्याग (आमरण) उपोषणाला बसणार आहेत. यासंदर्भात त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी इशारा दिला आहे.
तक्रारदार सुभाष माळी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शहरातील विविध प्रभागांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे वर्षानुवर्षे रखडलेली आहेत. नगरपंचायत प्रशासनाकडे व जिल्हा स्तरावर वेळोवेळी निवेदने देऊनही कोणत्याही ठेकेदारावर अधिकृत कारवाई झालेली नाही. मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यांकडेही ठेकेदार दुर्लक्ष करत असून यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
अपूर्ण कामे आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप :
काँक्रीट गटारी (प्रभाग ८, १०, १४, १५) : २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुमारे ५० लाख रुपयांच्या कामाचा कार्यादेश देण्यात आला. काम प्रगतीपथावर दाखवण्यात आले असले तरी अडीच वर्षानंतरही प्रत्यक्ष काम अपूर्णच आहे.
पेव्हर ब्लॉक काम (सिद्धार्थनगर) : नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत (२०२२-२३) २७ एप्रिल २०२३ रोजी १६ लाख रुपयांच्या कामाचा कार्यादेश झाला. त्यापैकी ७ लाख ४५ हजार रुपये खर्च दाखवले गेले; मात्र तीन वर्षांनंतरही प्रत्यक्ष काम सुरूच झालेले नाही.
महात्मा फुले उद्यान : मंजूर २२ लाख ५२ हजार रुपयांपैकी १४ लाख रुपये खर्च होऊनही काम अर्धवट स्थितीत आहे.
स्वामी समर्थ मंदिरा जवळील सभागृह : २१ लाख रुपयांच्या कामापैकी १४ लाख ६९ हजार रुपये खर्च झाले, तरीही बांधकाम अपूर्ण आहे.
जॉगिंग ट्रॅक (एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेज ते भगवा चौक) : २० सप्टेंबर २०२४ रोजी १ कोटी रुपयांच्या कामाचा कार्यादेश निघाला. मुदतवाढ देऊन आणि ४९ लाख रुपये खर्च होऊनही काम रखडले आहे.
सुशोभीकरण (बुराईकाठ) : १ फेब्रुवारी २०१९ रोजी १ कोटी ३१ लाख रुपयांच्या कामाचा कार्यादेश दिला गेला. ४७ लाख रुपये खर्च दाखवून काम अपूर्ण सोडण्यात आले आहे.
संरक्षण भिंत (आपत्तीसौम्यीकरण योजना) : जुना पूल ते नदीपार भिलाटी दरम्यान ९८ लाखांचे काम (कार्यादेश ८ ऑगस्ट २०२५) व नवीन पूल ते भिलाटी दरम्यान ५३ लाखांचे काम (कार्यादेश २ जुलै २०२५) यांची मुदत संपली आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
प्रशासनाला जबाबदार धरण्याचा इशारा
यापूर्वी २९ जून २०२६ रोजी मुख्याधिकाऱ्यांना आणि २८ एप्रिल २०२६ रोजी तहसीलदार कार्यालयामार्फत पत्रव्यवहार करूनही परिस्थिती जैसे थे आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता ठेकेदार अनेक वर्षांपासून फिरकलेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या सर्व निष्क्रिय कारभाराच्या निषेधार्थ १४ ऑगस्ट २०२६ पासून शिंदखेडा नगरपंचायतीसमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येत असून, उपोषणादरम्यान आरोग्यास किंवा जीवितास काही धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची राहील, असा इशारा श्री सुभाष नागो माळी यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती धुळे जिल्हाधिकारी, शिंदखेडा तहसीलदार आणि शिंदखेडा पोलीस निरीक्षक यांना माहिती व आवश्यक कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
0 Comments