Header Ads Widget

*साळवे-हातनूर येथे क्रांती दिनानिमित्त एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न* *​स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान व इतिहास युवा पिढीसाठी प्रेरणादायी : प्रीतम निकम*

​ शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (राष्ट्रीय सेवा योजना विभाग) आणि श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै. शं. दे. पाटील उर्फ बाबुराव दादा कला, वाणिज्य व कै. भाऊसाहेब म. दि. सिसोदे विज्ञान महाविद्यालय, शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिनाचे औचित्य साधून दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी क्रांती स्मारक, साळवे-हातनूर (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.
​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  बापूसाहेब प्रफुल्लकुमार सिसोदे होते. कार्यशाळेचे प्रमुख वक्ते म्हणून शहादा येथील  श्री. प्रीतम निकम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात निकम म्हणाले की, "क्रांती दिन हा केवळ एक ऐतिहासिक दिवस नसून तो भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील अखंड त्यागाचा प्रतीक आहे. आजच्या युवा पिढीने क्रांतिकारकांचे जीवनचरित्र आणि त्यांचे योगदान अभ्यासत राष्ट्रनिर्मितीत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे."
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवचौ उमवि च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रवीण महाले यांनी केले. रासेयोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम आणि समाजभान निर्माण करण्याच्या उद्दिष्टांवर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आशुतोष पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून स्वागतपर मनोगत व्यक्त केले. तर  श्री. नितीन ठाकूर यांनी या ऐतिहासिक स्थळी कार्यशाळा आयोजित करण्यामागचा मूळ उद्देश उपस्थितांना पटवून दिला.
​या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख वक्ते  शहादा येथील  श्री. प्रीतम निकम,श्री. नितीन ठाकूर,  श्री. अमोल मराठे, कबचौ उमवि अधिसभेचे माजी सदस्य श्री. दिनेश चित्तम, महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष  बापूसाहेब अशोक पाटील तसेच माजी संचालक  भाऊसाहेब प्रा. सुरेश देसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
​अध्यक्षीय भाषणात बापूसाहेब प्रफुल्लकुमार सिसोदे यांनी क्रांती स्मारकाच्या पवित्र भूमीत अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांवर देशप्रेमाचे संस्कार दृढ होतात, असे मत व्यक्त केले.
​कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. पवार, उपप्राचार्य प्रा. एस्. व्ही. बोरसे, कार्यालयीन अधीक्षक श्री. आर. एम. पाटील, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश अहिरराव यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. आशा कांबळे व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. जे. सोनवणे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. शेवटी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
​या कार्यशाळेस धुळे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे शेकडो स्वयंसेवक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांती स्मारकाच्या ऐतिहासिक परिसरात पार पडलेल्या या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, क्रांतिकारकांचे बलिदान आणि राष्ट्रनिर्मितीतील युवकांची भूमिका याबाबत नवी जाणीव व जागृती निर्माण झाली.

Post a Comment

0 Comments